मुंबई : विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज (शुक्रवारी) अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबतचा मुद्दा अनेकांनी मांडला. विशेष म्हणजे याबाबतही दोन मतप्रवाह असल्याची बाब समोर आली.
सत्तेत सहभागी होण्यावरुन शरद पवार गटात दोन मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. विशेष म्हणजे एक गट थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी आग्रही असून यासाठी शरद पवार यांच्यावर दबाव वाढवला आहे. दुसरा गट हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार गटातील काही नेत्यांचा दबाव आहे. मुंबईतील बैठकीत दोन्ही मतप्रवाहाच्या कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे मांडले.
दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षातून सध्या सातत्याने वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राजीनामा देणार असल्याची चर्चा समोर आली होती. त्यानंतर आता सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आग्रही आहेत. विशेष म्हणजे सत्तेत कसं सहभागी व्हावं? याबाबतही पक्षात दोन मतप्रवाह आहेत.