17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूरसुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी चांगले  संस्कार हवे

सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी चांगले  संस्कार हवे

लातूर : प्रतिनिधी
पालकांनी अधिक संपत्ती कमावण्याच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षकांनीही पाठ्यपुस्तकातील एखादा पाठ शिकवायचा राहिला तरी चालेल, सुसंस्कृपिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे अतिशय गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन व प्रदर्शन-२०२५  च्या उद्घाटन  प्रसंगी उद्घाटक या नात्याने सहकार मंत्री पाटील मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी खासदार डॉ. शिवाजी काळगे होते. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  सहकार्याने पार पडत असलेल्या या महासंमेलनाच्या उद्घाटन  प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धिरज विलासराव देशमुख, आमदार विक्रम काळे, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी (योजना) तृप्ती अंधारे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.  दीपप्रज्वलन व लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. डॉ. संदीप जगदाळे यांनी शैक्षणिक पोवाडा सादर केला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी  मानवी जीवनातील संस्काराचे असलेले अनन्यसाधारण असे महत्व अधोरेखित केले. समाजाच्या प्रगतीसाठी सहकार  आणि शिक्षण या दोन अतिशय महत्वपूर्ण बाबी असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांना शिक्षण देताना त्यांच्या रुचीप्रमाणे, आवडीप्रमाणे देणे आवश्यक आहे. ज्या विषयात त्याला रस आहे, तोच विषय शिकू द्या. अपयश आले तर त्याला प्रोत्साहन द्या. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे समजवून सांगा. मोबाईलचा वापर चुकीचा नाही. पण त्याचा अतिरेक होणार नाही, याची दक्षता बाळगण्याचे आवाहन करून लातुरात पार पडत असलेले हे शैक्षणिक महासंमेलन भव्यदिव्य असल्याचे सांगितले.
शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठवाडा शैक्षणिक महासंमेलनाचे आयोजन करण्याचा पहिला मान लातूरला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शैक्षणिक क्षेत्रात आता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब  होत असून त्याची सर्वंकष माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अतिशय महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना खासदार डॉ. शिवाजी काळगे  यांनी लातूरच्या सुसंकृत तसेच शैक्षणिक परंपरेला साजेल असा हा कार्यक्रम असल्याचे सांगितले.  सरकारचे शिक्षण क्षेत्राकडे म्हणावे तेवढे गांभीर्याने लक्ष नाही, असे दिसून येते. सरकारकडून शिक्षण क्षेत्राकडे अधिक बजेट उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगीण सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मोबाईल व्यसनाधीनतेवर लक्ष देण्याची अधिक गरज आहे. येत्या काळात नवीन तंत्रज्ञानाचे फायदे व तोट्यावरही चर्चा होणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियाने नुकताच एक कायदा केला आहे. मोबाईलमधील अ‍ॅक्सेस कमी करण्याचा. आपल्याकडेही तसे होणे गरजेचे आहे.  लातूरला केंद्र सरकारचे एखादे चांगले शैक्षणिक इन्स्टिट्यूट, विद्यापीठ  उभारले जावे यासाठी आपण प्रयत्नशील राहू. या महासंमेलनाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही खासदार डॉ. काळगे यांनी केले.
प्रास्ताविक महासंमेलनाचे अध्यक्ष ओमप्रकाश झुरळे यांनी केले. प्रास्तविकात  त्यांनी या महासंमेलनाच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विस्तृतपणे विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विवेक सौताडेकर यांनी तर आभार विजय सहदेव यांनी मानले. या महासंमेलनाच्या यशस्वीतेसाठी   अध्यक्ष ओमप्रकाश झुरळे, उपाध्यक्ष विजय सहदेव, सचिव प्रमोद भोयरेकर, कोषाध्यक्ष अमोल चव्हाण, संचालक विवेक सौताडेकर यांसह  अनेक मान्यवर परिश्रम घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR