25.8 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा

ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा

संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर

नागपूर : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सा-यांना महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले असून दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गट महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवार दि. ११ जानेवारी रोजी केली.

नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायचंच आहे, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. कारण मुंबई, ठाणे नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतोय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया देत भाष्य केले आहे.

राऊतांच्या वक्तव्याशी सहमत : आ. ठाकरे
मनपा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय जर हा महाविकास आघाडीचा असेल तर तो सर्वांना मान्य असेल. परंतू नागपुरात तरी काँग्रेस हा पक्ष सर्वात निवडणुका स्वबळावर लढत आला आहे. तसेच काँग्रेस पक्षाला प्रत्येक बुथवर चांगले मतदान होत आला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर आम्हाला कुठलीही हरकत नाही. सोबतच त्यांनी कार्यकर्त्यांबाबत संधी मिळत नसल्याच्या वक्तव्यावर मी सहमत आहे. ती खरी गोष्ट असून पक्ष वाढीसाठी या निवडणुका स्वबळावरच लढल्या पाहिजेत. अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याला सहमती दिली आहे.

चर्चा करुन निर्णय घ्यावा : आव्हाड
संजय राऊत यांच्या स्वबळाच्या ना-यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण पण आपण एकत्रित विधानसभेत झालेल्या पराभवा नंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होते असे माझे तरी मत आहे त्याच्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय ग्राउंड वरती कार्यकर्त्यांचे मत काय आहे हे आम्हालाही माहिती आहे.

तो त्यांचा प्रश्न : कोकाटे
संजय राऊत यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी म्हटले की, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय करावे? कुणासोबत लढावे? कुणासोबत लढावे? उघडे लढावे की कपडे घालून लढावे,तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जे योग्य वाटते आहे त्यांनी ते करावे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR