कोल्हापूर : आघाडीमध्ये यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना देखील अनेक महापालिका वेगवेगळ्या लढल्या आहेत. तीन पक्षाची भूमिका जिथे शक्य होईल तिथे युती करणार अशीच आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. वरिष्ठ आम्ही एकत्र बसून धोरण ठरविणार आहोत. कोल्हापुरात आमची युती व्हायला काही अडचण येणार नाही असे वाटते. वेगळं लढल्याने महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल, असे काही होणार नाही. महायुतीमध्ये देखील जिथे शक्य असेल तिथे युती करणार असे मुख्यमंत्री म्हणाले होते, असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.
कॉंग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे. जिथे स्वबळावर लढण्याची संधी असेल त्याठिकाणी आम्ही ही लढू. २२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्यानंतर कळेल महापालिका निवडणुका लागणार का ? निवडणूक आयोग सर्व निवडणुका पावसाळ्याच्या अधिक घेऊ शकतो का ? हा मोठा प्रश्न आहे. कोणत्या निवडणुका पहिले होणार त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत, असेही ते म्हणाले. विधानसभा आणि महानगरपालिकेचा पॅटर्न वेगळा आहे. मुंबई महानगरपालिकेत पूर्वी काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं देखील ताकद आहे. सध्या राज्यातील जनता प्रशासनाच्या कारभाराला कंटाळलेली आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेवर ठेवलेल्या कंट्रोलला जनता कंटाळली आहे. यामुळे जनता कौल आमच्या बाजूने देईल. ओबीसी आरक्षण एक याचिका आणि प्रभाग रचनेवरची एक याचिका सुप्रीम कोर्टात आहे. २२ तारखेला काय निर्णय लागतो त्यावर सगळं पुढे ठरणार आहे त्यानंतर आम्ही सामोरे जाऊ, असे सतेज पाटील म्हणाले.