मुंबई : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम-काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, केंद्र व राज्य शासनाकडून राबवण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. यासह राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतला.
यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाकडून अनुदानित प्रकल्पामध्ये नाशिक येथील राम-काल पथ विकास, सिंधुदुर्गातील मालवण येथील पाण्याखालील सागरी पर्यटनाचा अनुभव, स्वदेश दर्शन अंतर्गत आंबेगाव पुणे येथे पुरंदर शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास, अजंठा वेरूळ पर्यटन विकास ही कामे सुरू करून त्याला गती देण्यात येणार आहे.
स्वदेश दर्शन २.० अंतर्गत अहिल्यानगर येथे किल्ल्यावरील पर्यटन आकर्षणासाठी उपक्रम राबविण्या संदर्भातील कामे तातडीने पूर्ण करावी. राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अमृत सांस्कृतिक वारसा पालघर येथील आदिवासी विकास पर्यटनाला चालना देणे, शिवसृष्टी थीम पार्क राज्यातील पाच ठिकाणी उभारणे, पंढरपूर येथे सभा मंडप स्कायवॉक या सर्व कामांसाठी सल्लागार नेमून ही कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.
पर्यटन विभागाने ३१ मार्चपूर्वी उद्योग प्रमाणपत्र, कृषी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र ,साहसी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र, कॅराव्हॅन पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र, आई महिला उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नोंदणी, पर्यटन व्हिलाची नोंदणी, पर्यटन अपार्टमेंटची नोंदणी प्रमाणपत्र, होम स्टे नोंदणी प्रमाणपत्र, व्यावसायिक गृहाची पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र या नवीन सेवा लवकरात लवकर सुरू कराव्यात असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.