कोटा : राजस्थानमधील कोटा येथे एका २८ वर्षीय तरुणाने पत्नीशी झालेल्या भांडणानंतर कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी, सकटपुरा येथील आपल्या सासरहून परतणा-या एका व्यक्तीने रस्त्यात आपली कार थांबवली आणि पत्नी आणि मुलांसमोर कालव्यात उडी मारली.
कोटा जिल्ह्यातील चेचट शहरातील रहिवासी रघुनंदन उर्फ निक्की (२८) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला आणि शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनंदन यांनी उडी मारल्यानंतर त्यांची पत्नी पिंकीने तात्काळ पोलिसांना फोन केला.
अधिकारी अरविंद भारद्वाज म्हणाले की, माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले, परंतु रात्र असल्याने बचावकार्य सुरू करता आले नाही. सोमवारी सकाळी बचावकार्य सुरू करण्यात आले आणि घटनास्थळापासून सुमारे २ किमी अंतरावर मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर, पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. रघुनंदन यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कौटुंबिक वादाबद्दल पोस्ट केली होती पण नंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. रघुनंदन यांच्या वडिलांनी सांगितले की ते डान्सर म्हणून काम करायचे. पिंकीला तिच्या पहिल्या पतीपासून तीन मुलं होती, जी या जोडप्यासोबत राहत होती.