नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी २०२४ च्या सार्वजनिक निवडणुकीवर प्रतिक्रिया केली होती. आता मेटाला संसदीय स्थायी समितीकडून समन्स मिळण्याची शक्यता आहे.
मार्क झुकरबर्ग म्हणाले होते की, कोविड १९ नंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकारे पडली. अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या खोट्या दाव्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप खासदार आणि संसदेच्या कम्युनिकेशन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे म्हणाले की, चुकीची माहिती पसरवल्याबद्दल मेटाला समन्स बजावले जाईल. लोकशाही देशाबद्दल चुकीची माहिती त्याची प्रतिमा मलिन करते. या चुकीबद्दल कंपनीने संसदेची आणि येथील लोकांची माफी मागितली पाहिजे.
१० जानेवारी रोजी एका पॉडकास्टमध्ये, फेसबुकचे सह-संस्थापक ४० वर्षीय झुकरबर्ग म्हणाले की, कोविड महामारीमुळे जगभरातील विद्यमान सरकारांवरील विश्वास उडाला आहे. त्यांनी या संदर्भात भारताचे उदाहरण चुकीचे दिले. ते म्हणाले, २०२४ हे जगभरातील निवडणुकीचे एक मोठे वर्ष होते आणि भारतासह या सर्व देशांमध्ये निवडणुका झाल्या. विद्यमान सरकारे मुळात प्रत्येक निवडणुकीत पराभूत झाली. जागतिक स्तरावर काही मोठे कारण होते, मग ते महागाई असो किंवा आर्थिक संकट. मात्र कोविडशी लढणा-या सरकारांवरही त्याचा लक्षणीय परिणाम झाला. त्यांनी दावा केला की, लोकशाही संस्थांवरील लोकांचा विश्वासही कमी झाला आहे.