लातूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या १११ पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचे नियोजन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केले आहे. या योजनांचे ७५ टक्केपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून या कामाला गती दिली जाईल.
जल जीवन मिशन ही केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेली महत्वकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी पुरवठा करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात या योजनेतून आतापर्यंत ३२५ योजना पूर्ण झाल्या असून याद्वारे सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ७४ हजार ५८२ कुटुंबांपैकी जलजीवन कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी १ लाख ६६ हजार ९०० इतक्या नळजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. तसेच १ लाख ९४ हजार २०६ कुटुंबांना जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळजोडण्या दिलेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये एकूण ३ लाख ६१ हजार १०६ इतक्या म्हणजेच ९६.४० टक्के नळ जोडण्या दिलेल्या आहेत. अद्याप १३ हजार ४७६ कुटुंबाना नळजोडण्या देणे शिल्लक आहे.
या योजनेमध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीचे सहकार्य घेण्यात येत असून कामांचा दर्जा, गुणात्मकता राखून कामे पूर्ण करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी वारंवार आढवा बैठक घेवून योजनेच्या कामांसाठी जमिनीच्या अडचणीचे निराकरण योजनेच्या कामाला गती दिलेली आहे. या कामांसाठी अनेक गावांमध्ये दानशूर व्यक्तींनी जलकुंभ उभारणीसाठी जमीन दान केली आहे. तसेच उर्वरीत ज्या ठिकाणी अद्यापही जागा उपलब्ध झालेली नाही, अशा ३० योजनांसाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी पुढे येऊन जागा उपलब्ध करुन द्यावी, असे अवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केलेले आहे.
जल जीवन कार्यक्रमांतर्गत ज्या कंत्राटदारांनी अद्यापही काम सुरु केलेले नाही किंवा काम अतिशय संथ गतीने सुरु आहे, अशा ७ योजनांच्या कंत्राटदारांवर काळ्या यादीमध्ये टाकण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. या कामाच्या फेरनिविदा करुन कामे सुरु करण्यात आलेली आहेत. तसेच जे कंत्राटादर अपेक्षित गतीने काम करीत नाहीत, अशा ४६९ कंत्राटदारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांनी दिली.