इंपाला : वृत्तसंस्था
सोन्याच्या खाणीत बेकायदेशीरपणे काम करणा-या कामगारांसोबत मोठी दुर्घटना घडली. खाणीत अडकलेल्या १०० हून अधिक मजुरांचा मृत्यू झाला, असून ५०० हून अधिक खाण कामगार अजूनही आत अडकले आहेत.
या मजुरांचा अन्न-पाण्याविना मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, खाणीत उपासमारीने कामगार मरतच होते, पण बाहेर कोणालाच त्याची माहिती नव्हती. खाण कामगारांचे प्रतिनिधित्व करणा-या गटाचे प्रवक्ते साबेलो म्गुनी म्हणाले की, हे कामगार अनेक महिन्यांपासून उत्तर पश्चिम प्रांतातील खाणीत अडकले आहेत. उपासमारीमुळे किमान १०० खाण कामगारांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित खाण कामगारांनी या मृत कामगारांचा व्हिडिओ पाठवल्यामुळे घटना उघडकीस आली.
सध्या मृतदेह बाहेर काढले जात आहेत. याशिवाय अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे कामही सुरू आहे. आतापर्यंत १८ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून २६ जिवंत लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. खाणीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सोमवारपासून नव्याने बचाव कार्य सुरू केले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत अवैध खाण काम सामान्य बाब आहे. कंपन्यांनी बंद केलेल्या खाणींमध्ये बेकायदेशीरपणे घुसून सोन्याचा साठा शोधण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच एका खाणीत हा दुर्दैवी अपघात झाला आहे.