वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत काम करण्यासाठी ‘एच १-बी’ व्हिसा अतिशय महत्वाचा आहे. हा व्हिसा मिळवण्याचे हजारो भारतीयांचे स्वप्न आहे. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासनाच्या धोरणामुळे अनेक भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत, त्यापूर्वीच अनेक अमेरिकन कंपन्यांनी भारतीयांना दिलेल्या नोकरीच्या ऑफर्सही रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, अमेरिकेत शिक्षण घेण्याच्या विचारात असलेल्या विद्यार्थ्यांनाही मोठा धक्का बसू शकतो.
‘एच १-बी’ व्हिसा प्रोग्राम हा यूएसमधील परदेशी लोकांसाठी सर्वात मोठा तात्पुरता वर्क व्हिसा आहे. २०२३ च्या प्यू रिसर्चच्या अहवालात असे दिसून आले आहे की, अमेरिकेत इमिग्रेशन १६ लाखांनी वाढले आहे, जी गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठी वाढ आहे. यामागे अनेक अमेरिकन लोकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वीच इमिग्रेशन धोरणांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आणि अधिकाधिक अमेरिकन लोकांना कामावर घेण्याचे आश्वासन दिले आहे. इमिग्रेशन व्यवस्थेवरील वादामुळे अमेरिकेतील सर्वात जास्त ‘एच १-बी’ व्हिसाधारक असलेल्या भारतीयांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
‘एच १-बी’ व्हिसा कार्यक्रम कुशल कामगारांना अमेरिकेत आणण्यासाठी तयार करण्यात आला होता. अमेरिकन कामगारांना कमी लेखणारा हा कार्यक्रम असल्याची ट्रम्प समर्थकांमध्ये चर्चा आहे. या कार्यक्रमात भारतीयांचे वर्चस्व आहे. ७२% ‘एच १-बी’ व्हिसाधारक भारतीय, तर १२% चिनी नागरीक आहेत. आता ट्रम्प प्रशासनात फक्त अमेरिकेत जाण्याच्याच्या विचारात असलेल्यांना अडचण येणार नाही, तर तिथे राहणा-या लोकांच्या नोकरीवरही धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. सध्या अमेरिकन विद्यापीठांमध्ये भारतातील २,५०,००० हून अधिक विद्यार्थी आहेत. मात्र, आता कडक अंमलबजावणीमुळे रोजगाराची चिंता निर्माण झाली आहे.