नवी दिल्ली : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीओके आणि पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले असून ९ व्या सशस्त्र सेना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, जम्मू-काश्मीर पीओकेशिवाय अपूर्ण आहे. पीओके पाकिस्तानचा नाही, तर भारताचा भूभाग आहे. पीओकेच्या जमिनीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी केला जात आहे. पीओकेमध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवली जातात, असा दावा त्यांनी केला.
जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे माजी सैनिकांना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पीओकेच्या भूमीचा वापर करत आहे. आजही तेथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. सीमेजवळील भागात लाँच पॅड बनवण्यात आले आहेत. भारत सरकारला याची संपूर्ण माहिती आहे. पाकिस्तानने पीओकेत दहशतवादी कारवाया थांबवाव्या, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
भारत नेहमीच पाकला वरचड
संरक्षण मंत्री पुढे म्हणतात, भारत आणि पाकिस्तानमध्ये १९६५ मध्ये अखनूर येथे युद्ध झाले होते. पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न हाणून पाडण्यात भारताला यश आले. इतिहासातील सर्व युद्धांमध्ये भारताने नेहमीच पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तान १९६५ पासून अवैध घुसखोरी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. आपल्या मुस्लिम बांधवांनी दहशतवादाविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आजही भारतात घुसणारे ८०% पेक्षा जास्त दहशतवादी हे पाकिस्तानचे आहेत. सीमेपलीकडील दहशतवाद १९६५ मध्येच संपुष्टात आला असता, परंतु तत्कालीन केंद्र सरकार योग्य पाऊले उचलू शकली नाही.
जम्मू-काश्मीरचा पाकला पाठिंबा नाही
राजनाथ सिंह म्हणाले, १९६५ च्या युद्धादरम्यान किंवा दहशतवादाच्या शिखरावर असताना जम्मू-काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानला साथ दिली नाही. अनेक मुस्लिम बांधवांनी दहशतवादाशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या मोहम्मद उस्मान यांच्यासारख्या व्यक्तींच्या बलिदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.