मुंबई : प्रतिनिधी
भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीतील मेळाव्यात केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज जोरदार समाचार घेतला. राज्यात व देशपातळीवर भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी विविध पदावर काम केले. पण कोणावर स्वत:च्या राज्यातून तडीपार होण्याची वेळ आली नव्हती, असा पलटवार शरद पवार यांनी केला. पूर्वी सर्व पक्षात सुसंवाद होता. पण सध्या सत्तेवर असलेल्या लोकांनी पातळी सोडल्याचे दिसते. अमित शाह यांची टीका जिव्हारी लागली नाही, कारण नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, असा टोलाही पवारांनी लगावला.
पक्ष पदाधिका-यांच्या शिर्डीत झालेल्या मेळाव्यात बोलताना अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात टीका केली होती.१९७८ पासून शरद पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केले. उद्धव ठाकरे यांनीही २०१९ ला दगाबाजी केली. महाराष्ट्रातील जनतेने या विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवल्याची टीका अमित शहा यांनी केली होती. त्यावर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
सरदार पटेल यांच्यापासून स्व. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण अशा अनेक लोकांनी देशाच्या गृहमंत्रीपदावर काम केले. पदाची प्रतिष्ठा वाढवली. पुलोदच्या मंत्रिमंडळात हशू अडवाणी, उत्तमराव पाटील आदी नेते आपल्यासोबत होते. राज्यात व देशात त्यांनी उत्तम काम केले. पण त्यातील कोणाला आपल्या राज्यातून तडीपार व्हावे लागले नव्हते, असा टोला पवार यांनी लगावला. १९७८ साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, हे गृहस्थ तेव्हा कुठे होते माहिती नाही. थोडी माहिती घेऊन टीका केली तर बरे होईल, असा सल्ला पवार यांनी दिला. पूर्वीच्या काळात विविध राजकीय पक्षात एक प्रकारचा सुसंवाद होता. अटलबिहारी वाजपेयी हे कर्तृत्वान नेते होते. भुजमध्ये भूकंप झाला, त्यावेळी वाजपेयी यांनी एक बैठक बोलावली. मी विरोधी पक्षात असतानाही वाजपेयी यांनी मला एका समितीवर नेमले होते. याची आठवण देताना पवार यांनी भाजपाच्या सध्याच्या राजकारणावर प्रखर टीका केली.
स्व. बाळासाहेबांनी तेव्हा आश्रय दिला होता
अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना हेच अमित शाह गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, त्यावेळी सहकार्यासाठी बाळासाहेबांकडे आले होते, याची आठवण पवार यांनी दिली. उद्धव ठाकरे यावर अधिक तपशीलवार सांगू शकतील, असे त्यांनी सांगितले.
एकत्र राहण्याचा प्रयत्न राहील
इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आली होती. तेव्हाही राज्य किंवा स्थानिक पातळीवर आघाडी करण्याबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. मात्र महाराष्ट्रात आघाडी म्हणून एकत्र राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील १५ दिवसात महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन चर्चा करतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या एकाही खासदाराचे भाजपासोबत जावे असे मत नाही. याबाबतची चर्चा निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.