मुंबई : प्रतिनिधी
भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवणा-या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबईत येत असून, या दौ-यात ते महायुतीच्या आमदारांनीही मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या वर्गाला उपस्थित राहण्याच्या सक्त सूचना मंत्री, आमदारांना देण्यात आल्या आहेत. लोकांनी दाखवलेला विश्वास व वाढलेल्या अपेक्षांची जाणीव ठेऊन पुढील पाच वर्षांत करावयाची कामे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान मार्गदर्शन करणार असल्याचे समजते.
महायुती सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत हजेरी लावली होती. त्यानंतर ते आता बुधवारी दुस-यांदा मुंबईत येत आहेत. मुंबईच्या नौदल गोदीत त्यांच्या हस्ते सकाळी १०.३० च्या सुमारास आय.एन.एस. सुरत, आय.एन.एस. निलगिरी व आय.एन.एस. वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रर्पण होईल. त्यानंतर नौदल गोदीमध्येच महायुतीचे मंत्री व आमदारांची शाळा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आदी नेतेमंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांसाठी खास जेवणाचाही बेत आखला गेला आहे.
लोकसभा ते विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुतीला चांगले यश मिळाले आहे. या यशामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. महायुतीला यश मिळाले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गाफील राहू नका, आतापासूनच कामाला लागून महायुतीच्या प्रगतीचा आलेख असाच चढता राहू द्या, असा कानमंत्र पंतप्रधान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींची मुंबई भेट महत्वाची मानली जात आहे.