मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरी पहाटे ३ वाजता चाकू हल्ला झाला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफच्या प्रकृतीबद्दल लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमणी यांनी माहिती देताना सांगितले, सैफ अली खानवर त्याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला.
त्याच्या शरीरावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने केलेल्या सहा जखमा आढळून आल्या आहेत. त्यातील दोन जखमा खोलवर आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी सात पथके स्थापन केली आहेत.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक सैफच्या घरी
दरम्यान, या घटनेनंतर तपासासाठी गुरुवारी सकाळी पोलिस अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक मुंबई वांद्रे येथील अभिनेता सैफ अली खानच्या घरी पोहोचले. दया नायक चौकशीनंतर सैफच्या घरातून बाहेर पडत असल्याचे व्हीडीओत दिसत आहे.
सैफच्या फ्लॅटमध्ये हल्लेखोराने कसा प्रवेश केला?
सैफच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा वांद्रे पोलिस, मुंबई गुन्हे शाखा तपास करत आहे. पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सध्या सुरू असलेल्या तपासाबाबत बोलताना सांगितले की, घरात घुसलेला हल्लेखोर सुरक्षा भेदून आत आला. सैफच्या फ्लॅटमध्ये हल्लेखोराने कसा प्रवेश केला? हे शोधण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हल्लेखोराने चोरीचा प्रयत्न केला होता की त्याचा दुसरा काही हेतू होता? याचादेखील तपास केला जात आहे.
एका महिला कर्मचा-याशी वाद
सैफचे कुटुंबीय घरात असताना हल्लेखोर त्याच्या घरात घुसला, असे सांगण्यात आले आहे. हल्लेखोराने प्रथम सैफच्या घरातील एका महिला कर्मचा-याशी वाद झाला. त्यानंतर सैफने त्यात हस्तक्षेप करत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. घराची सुरक्षा भेदून हल्लेखोर कसा आत गेला? याची चौकशी पोलिस करत आहेत.
ही घटना ‘सतगुरु शरण’ इमारतीत घडली. या इमारतीच्या फ्लॅटमध्ये सैफ अली खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान राहतात. सैफ झोपत असताना पहाटे २:३० च्या सुमारास हल्लेखोर त्यांच्या घरात घुसला असे वृत्त आहे. काहीतरी संशयास्पद आवाज ऐकू आल्यानंतर सैफ जागा झाला. घरातील कर्मचा-याशी झालेल्या वादानंतर हल्लेखोर आणि सैफमध्ये झटापट झाली. हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.