सोलापूर : येथील तरुणाच्या खून प्रकरणात सोलापूरचे माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह त्यांची दोन मुले, पुतण्या आणि इतर दोघे कोठडीत आहेत. याशिवाय आता सिद्धार्थ हाउसिंग सोसायटीचे सभासद करण्यासाठी व एनओसी देण्यासाठी तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन महिलांनी आणि हाउसिंग सोसायटीतील दुकानाला दरमहा पाच हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाने गायकवाडविरुद्ध खंडणीची फिर्याद दिली असून त्यावरून त्याच्याविरुद्ध खंडणीचे तीन गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून प्रमोद गायकवाड, मुलगा प्रसेनजीत ऊर्फ लकी प्रमोद गायकवाड, हर्षजीत ऊर्फ विकी प्रमोद गायकवाड, पुतण्या सोन्या ऊर्फ संजय देवेंद्र गायकवाड, सनी निकंबे आणि मनोज राजू अंकुश यांनी सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी परिसरात दोघांना मारहाण केली.
भांडण सोडविण्यासाठी त्याठिकाणी आलेल्या वैभव वाघेला जबर मारहाण केली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्य झाला. त्यानंतर पाच जणांविरुद्ध खुनाचे कलम वाढविण्यात आले. यात ते पाचही संशयित कोठडीत असतानाच सिद्धार्थ हाउसिंग सोसायटीत सभासद करून घेण्यासाठी दोन लाखांची, तर एनओसी देण्यासाठी एक लाखाची खंडणी मागणी करून दमदाटी केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड यांच्याविरुद्ध सुशिला तिपण्णा पोतेनवरू आणि मीनाक्षी संजय जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
तसेच आत्माराम जयवंत चंदनशिवे यांनीही मुलांविरुद्ध खोट्या केसेस करण्याची धमकी देऊन हाउसिंग सोसायटीतील दुकान चालू ठेवण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रमोद गायकवाडच्या अडचणीत वाढ झाली असून पोलिस या गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.
वैभव वाघे या तरुणाला न्याय मिळावा म्हणून दोन दिवसांपूर्वी सोलापुरात कँडल रॅली काढण्यात आली. त्या वेळी पीडित कुटुंबाने प्रमोद गायकवाड सोलापूरचे वाल्मीक कराड असल्याचे सांगत शरद पवार यांनी गायकवाड याची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. तसेच, प्रमोद गायकवाडच्या जामिनासाठी वरिष्ठ स्तरावरुन हालचाली सुरू असून संशयित आरोपींपासून आमच्या कुटुंबास धोका असल्याची भीतीही वाघे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.