मोहोळ: मालट्रकवर चालक म्हणून ठेवलेल्यानेच गाडीचे टायर, डिझेल विकून व खर्चाला दिलेले पैसे अशी एकूण दोन लाख ५० हजारांची फसवणूक केल्याची घटना पोफळी (ता. मोहोळ) येथे घडली. याप्रकरणी चालक नितीन अनिल कानडे याच्या विरोधात तब्बल वर्षान मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तानाजी दत्तू यजगर (वय ३७, रा. पोफळी) यांनी त्यांचे मेहुणे महावीर बंडगर यांच्या नावावर असलेली बारा टायरचा मालट्रक (एमएच १३ एएक्स २४८९) चालविण्यासाठी नोटरी करून घेतली होती. त्यावर चालक म्हणून नितीन कानडे (रा. वनसळ, ता. उ. सोलापूर) हा कार्यरत होता. २५ जून २०२३ रोजी मालट्रकला चितापूर ते आंध्र प्रदेश असे भाडे मिळाले होते. मालट्रकमध्ये केमिकलचे बॅरल भरले होते. २८ जून २०२३ रोजी हे भाडे पोच करून चालक कानडे हा उमदीजवळ आला. त्यावेळी त्याने मालक तानाजी यजगर यांना फोन करून कळविले की, विजयपूर ते मिरज या मार्गावर गाडीचा घोटाळा झाला आहे, तुम्ही तुमची गाडी घेऊन जावा, असे रागात सांगितले.
फोन आल्यावर ६ जुलै २०२३ रोजी गाडीचा घोटाळा असलेल्या ठिकाणी यजगर गेले असता, गाडी रस्त्यावर उभी असलेली दिसून आली व चालक त्या ठिकाणाहून पळून गेला होता. त्यावेळी यजगर यांनी गाडीची तपासणी केली असता, त्यांना
एक लाख ६५ हजार रुपये किमतीचे गाडीचे सहा टायर व ४५ हजार ५०० रुपयांचे डिझेल तसेच कानडेला खर्चासाठी दिलेले ४० हजार रुपये अशी एकूण दोन लाख ५० हजार ५०० रुपयांचा माल विकून फसवणूक केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी तानाजी यजगर यांच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलिसांत नितीन कानडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहेमोहोळ पोलिस तपास करीत आहेत.