मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होऊन पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप न झाल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले होते. त्यानंतर आता राज्याचे लवकरच अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे.
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. कृषक कृषी प्रदर्शनात अजित पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे येत्या ३ मार्चपासून सुरू होणार आहे. तर राज्याचा नवीन अर्थसंकल्प हा येत्या १० मार्च रोजी सादर होणार आहे. त्यामुळे आगामी अर्थिक वर्षामध्ये महायुती सरकार कोणत्या नवीन योजना आणणार आणि खर्च काढणार याचा लेखाजोखा मांडणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारवेळी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती. २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी ही योजना जाहीर केली होती. त्यानंतर अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला. महायुती सरकारने त्यावेळी दर महिन्या-दीड महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे.
त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दर महिन्याला २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये नवीन योजनेचा हप्ता जाहीर केला जाईल अशी माहिती महायुतीच्या नेत्यांनी दिली होती.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामधील महायुती सरकार स्थापन झाले आहे. महायुती सरकार पुन्हा एकदा स्थापन झाल्यानंतर पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. याची तारीख ही अर्थमंत्री अजित पवार यांनीच जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या ३ मार्चपासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहिणींना मोठी खुशखबर मिळणार आहे. अजित पवार हे १० मार्च रोजी जाहीर करणा-या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणा-या योजनेचा लाभ २१०० रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे.