मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरी मध्यरात्री अज्ञान हल्लेखोराने हल्ला केला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या या हल्लेखोराची चाहूल लागताच महिला कर्मचा-यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर सैफ अली खान याने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. हल्लेखोर आणि सैफ अली खान या दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. यामध्ये सैफ अली खानवर अनेक वार झाले. पैकी दोन वार अतिशय गंभीर स्वरुपाचे होते.
तातडीने सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान धोक्यातून बाहेर आल्याचे सांगितले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात तीव्र आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. कायदा सुव्यवस्था आणि गृहमंत्रालयावर टीका केली जात आहे. याला आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. मुंबईतील कायदा सुव्यस्था किती ढासळत आहे, याचे हे लक्षण आहे. मध्यंतरी त्याच भागात एकाची हत्या झाली आणि हा आता दुसरा प्रयत्न. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषत: मुख्यमंत्र्यांनी गृहखाते त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावे, असे शरद पवार म्हणाले होते. तर, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. मुंबई असो, बीड असो किंवा परभणी सगळीकडे कायदा सुव्यवस्था वा-यावर आहे.
पंतप्रधानाचे स्वागत, निवडणूक, शिबिरे यामध्ये सरकार गुंतून पडले आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला. तो मोठा कलाकार आहे. बुधवारी पंतप्रधान मुंबईत होते, सगळी सुरक्षा तिकडे असणार. पंतप्रधान मुंबईत असले तरीही महाराष्ट्रात काय चालले आहे हा प्रश्न राज्याच्या गृहमंर्त्यांनी स्वत:ला विचारला पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. याला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले.
पवार-राऊतांनी राजकारण करायची गरज नाही
सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिस तपास करत आहेत आणि लवकरच सत्य बाहेर येईल. परंतु, शरद पवार आणि संजय राऊत यांना लगेच राजकीय आखाड्यात उतरण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते, याचे भान कदाचित संजय राऊतांना नसेल, पण शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला ते असायला हवे, असे प्रत्युत्तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे.