19.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रईएसआयसीचे राज्यात आणखी १८ रुग्णालये

ईएसआयसीचे राज्यात आणखी १८ रुग्णालये

छत्रपती संभाजीनगर, पुण्यात प्रत्येकी २ रुग्णालये

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कामगारांसाठी आरोग्य सुविधा पुरविणा-या राज्य कामगार विमा सोसायटीने (ईएसआयसी) राज्यात १८ नवी रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी सर्वाधिक ४ रुग्णालये रायगडमध्ये तर छत्रपती संभाजीनगर व पुण्यामध्ये प्रत्येकी दोन रुग्णालये मंजूर झाली आहेत. या रुग्णालयासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

राज्य कामगार विमा सोसायटी राज्यातील कामगारांसाठी १२ रुग्णालये व संलग्न २५३ रुग्णालयातून आरोग्य सेवा पुरवते. राज्यात विमाधारक कामगारांची ४८ लाख ७० हजार ४६० कुटुंब आहेत तर लाभार्थी संख्या जवळपास दोन कोटीपर्यंत आहे. या कामगारांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी राज्यात विविध ठिकाणी १८ नवी रुग्णालये उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.

त्यानुसार रायगडमध्ये सर्वाधिक चार रुग्णालये उभारण्यात येणार असून, पेण, पनवेल, कर्जत व खोपोली येथे ही रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूंज आणि शेंद्रा येथे तर पुण्यामध्ये बारामती व चाकण येथे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालघर, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, वर्धा, अमरावती, सांगली, रत्नागिरी व चंद्रपूर येथे प्रत्येकी एक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. ही रुग्णालये उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, या जागा एमआयडीसी, जिल्हाधिकारी, डीपीआयआयटी, एसटीआयसीई, सिडको यांच्याकडून संपादित करण्यात येणार आहेत.

८ रुग्णालयांसाठी शिफारस
आठ रुग्णालयांसाठी स्थळ निवड समितीने जागांची शिफारस केली आहे, तर पाच रुग्णालयांसाठीच्या जागेचे प्रस्ताव ईएसआयसीच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच ५ रुग्णालये उभारण्यासाठी अद्यापपर्यंत राज्य सरकार किंवा एमआयडीसीने जागा निश्चित करून दिली नसल्याचे राज्य कामगार विमा सोसाटीकडून सांगण्यात आले. दरम्यान, या रुग्णालयांसाठी जागा संपादन करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR