जळकोट : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून जळकोट तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून यामुळे संपूर्ण तालुक्यावर धूक्याची चादर पसरली आहे. ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे रब्बी पिके धोक्यात सापडल्याने शेतक-यांची चिंता वाढली असून शेतकरी हवालदिल झाल आहेत.
यंदाच्या रब्बी हंगामात जळकोट तालुक्यात जवळपास २ ते ३ हजार हेक्टरवर गहू व हरभरा या प्रमुख पिकांसह इतर रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली. त्यानंतर शेतक-यांनी मेहनत व मशागत करून पिके वाढविली आणि ऐन हरभरा घाट्यावर असताना आणि गहू ओंब्यावर असताना ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभ-यावर मररोग आणि घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची तर गव्हावर तांबेरा रोग येण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. शेतक-यांच्या उत्पादनवाढीच्या नियोजनावर निसर्गाचा लहरीपणा कायम पाणी फेरत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिके हातची गेली आहेत.
आता तीच स्थिती रब्बी हंगामातही दिसत आहे. मागील १५ दिवसांपूर्वीही अचानक ढगाळ वातावरणासह प्रचंड धुके पडले होते. त्यानंतर मात्र वातावरण कोरडे राहिले आणि पुन्हा ११ जानेवारीपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा यासह इतर पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.