बिजापूर : वृत्तसंस्था
भारतीय सुरक्षा दलाच्या गाडीला आयईडी बॉम्बने उडवून ८ जवांना शहीद करणा-या राक्षसी नक्षलवाद्यांचा आज तितक्याच तीव्रतेने बदला घेण्यात आला. सुरक्षा दलाच्या जवानांनी आज छत्तीसगडमधील बिजापुरात सर्च ऑपरेशन जारी करत एका-एका नक्षलवाद्याला बिळातून बाहेर काढत त्याचा खात्मा केला. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी आज दिवसभरात तब्बल १२ नक्षलवाद्यांचे एनकाउंटर केले. जवानांकडून अजूनही परिसरात ऑपरेशन सुरु असल्याची माहिती आहे.
छत्तीसगडच्या बिजापूर येथे मोठ्या घातपाताची घटना घडली होती. नक्षलवाद्यांनी कुटरू परिसरात भर जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांच्या गाडीवर हल्ला केला होता. नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट घडवून आणत जवानांच्या गाडीला उडवले होते. या हल्ल्यात तब्बल ८ जवान शहीद झाले होते. तसेच एका ड्रायव्हरचादेखील मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. अखेर भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या घटनेनंतर अवघ्या १० दिवसांत बदला घेतला. सुरक्षा दलाच्या जवानांनी आज १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.