17.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeपरभणीनागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्या

नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्या

परभणी/प्रतिनिधी
नागरिकांना शासनाच्या विविध सेवा, योजनांचा लाभ विहीत कालावधीत मिळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना वेळेवर सेवा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी सूचना छत्रपती संभाजीनगरचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी केली.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या विविध सेवांच्या अंमलबजावणीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज डॉ. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सर्व उपविभागीय अधिकारी व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. जाधव यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ बाबत सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे दिली.

आपले सरकार पोर्टलवर सर्व पदनिर्देशित अधिकारी तसेच प्रथम व व्दितीय अपीलीय अधिकारी यांनी भरावयाच्या प्रपत्र ३ ते ५ बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ज्या विभागांनी हे प्रपत्र भरलेली नाहीत त्यांनी तात्काळ ते भरावेत असे निर्देश दिले. शासनाच्या ९६९ सेवा अधिसूचित करुन आपले सरकार सेवा पोर्टलवर ५३६ सेवा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामपंचायत पातळीपासून ते जिल्हास्तरीय कार्यालयाशी संबंधित सेवांचा समावेश असून या सर्व सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे.

या अर्जावर निर्णय घेण्यासाठी पदसिध्द अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. या पदसिध्द अधिका-यांनी आपल्याकडे ऑनलाईन स्वरुपात प्राप्त होणा-या अर्जांचा निपटारा विहीत कालावधीत करावा. आपले सरकार सेवा केंद्रातून विविध सेवांसाठी अर्ज करता येतो. त्याचप्रमाणे अपीलही करता येते. याबाबतचा फलक प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये लावावा. तसेच या ठिकाणी तक्रार पेटीही लावण्यात यावी. या माध्यमातून प्राप्त तक्रारींचा वरीष्ठ अधिका-यांनी आढावा घेऊन तक्रारींचे निराकरण करावे. आपले सरकार सेवा केंद्रांची नियमितपणे तपासणी करण्यात यावी अशा सूचना डॉ. जाधव यांनी केल्या. विहीत कालावधीत नागरिकांना सेवा उपलब्ध करुन देणे आपले कर्तव्य आहे. त्यामधील अडचणी दूर करुन त्यांच्या अंमलबजावणीत प्रलंबितता राहू नये असे सूचित केले.

जिल्हाधिकारी गावडे यांनी प्रलंबित, निपटारा प्रकरणाची माहिती सांगितली. प्रास्ताविक­ निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले. यावेळी विभाग प्रमुख, प्रथम अपिलीय अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR