मुंबई : राज्य मागासवर्गीय आयोगाच्या दुस-या सदस्याने सुद्धा राजीनामा दिला आहे. लक्ष्मण हाके यांनी सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गेल्या दोन आठवड्यात झालेल्या मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला हाके हे उपस्थित होते. मात्र हाके यांनी आयोगाला सदस्यतेचा राजीनामा देत असल्याचे कळवले आहे. यापूर्वी आयोगाच्या बी एस किल्लारीकर यांनी सुद्धा राजीनामा दिला होता.
सर्व समाजाच्या मागासलेपणाचे सर्व्हेक्षण करावे अशी मागणी किल्लारीकर यांनी केली होती. पण, याबाबत एकवाक्यता न झाल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता हाके यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे. मागासवर्ग आयोगातील इतर काही सदस्यांमध्ये देखील अस्वस्थता असल्याचे सांगण्यात येते.
सध्या राज्याची सामाजिक परिस्थिती ठीक नाही.
त्यामुळे एका समाजाचे सर्व्हेक्षण करण्यापेक्षा सर्व समाजाचे सर्व्हेक्षण करावे. जाती आधारित सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करणे चांगले ठरेल. यामुळे प्रत्येक समाजाची खरी स्थिती समोर येईल. त्यामुळे शास्ज्ञोक्त माहिती जमा होईल, अशी माझी मागणी होती. पण, सदस्यांमध्ये एकवाक्यता झाली नाही, असे किल्लारीकर म्हणाले.