सोलापूर : मोठ्या अपेक्षा ठेवून के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा रस्ता धरलेल्या सोलापुरातील नेत्यांचा तेलंगणामधील निकालाने पुरता भ्रमनिरस झाला आहे. आता या नेत्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी हैदराबादच्या गुलाबी वादळाकडून पाठबळ मिळते का, हे पाहावे लागेल. सामाजिक समीकरण पाहून बीआरएसने जोर लावला होता. मात्र, या पराभावामुळे बीआरएसची सत्तेची गाडी तेलंगणामध्ये पंक्चर झाल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नेत्यांची घालमेल वाढली आहे.
एमआयएमच्या वाटेनेच हैदराबादहून गुलाबी वादळ महाराष्ट्रात विशेषतः सोलापुरात धडकले होते. सोलापुरातून मोठा दारूगोळाही बीआरएसच्या हाती लागला होता, त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे सोलापूर जिल्ह्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीतच आमदार (स्व) भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता. बीआरएसच्या माध्यमातूनच भगीरथ यांनी पंढरपूर-मंगळवेढ्याच्या आमदारकीचे स्वप्न रंगवले होते.
भालके यांच्यानंतर सोलापूरचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे सुपुत्र माजी नगरसेवक नागेश वल्याळ आणि काही माजी नगरसेवकही बीआरएसच्या गळाला लागले होते. सोलापूर ग्रामीण आणि शहरातील मोठे चेहरे गळाला लागल्याने बीआरएस आगामी निवडणुकीत कमाल करेल, असे सर्वांना वाटत होते. विशेषतः राज्यातील प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षांतील नाराज नेत्यांना बीआरएस हक्काचा पक्ष वाटू लागला होता.
सोलापूर शहरात सुमारे अडीच ते तीन लाखांच्या आसपास तेलुगू भाषिक समाज आहे. हा समाज पुढे ठेवूनच बीआरएसने सोलापूरवर विशेष लक्ष केंद्रित केले होते, त्यामुळे तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालाकडे अख्ख्या सोलापूरचे लक्ष होते. मात्र, या निवडणुकीत बीआरएसचा दारुण पराभव तर झाला. पण एका मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सोलापुरातील नेत्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
महाराष्ट्रातील पक्षांकडून संधी मिळू न शकलेले अनेक मातब्बर नेते संधीच्या शोधात होते. अस्वस्थ असलेल्या नेत्यांना बीआरएसचा मोठा आसरा वाटत होता. मात्र, तेलंगणातच बीआरएस पक्षाचा पराभव झाल्याने महाराष्ट्रातील विशेषतः सोलापुरातील इच्छुकांना बळ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र दुणावला आहे.
सोलापूरसाठी केसीआर यांनी दोन दिवसांचा वेळ दिला होता. त्यांच्या खासदार कन्येनेही सोलापूरचा दौरा केला होता. मंत्री आणि केसीआर यांच्या मर्जीतील मंत्र्यांचा सोलापुरात कायम राबता असायचा. आषाढी एकदशीच्या निमित्ताने केसीआर यांनी वातावरण निर्मिती केली होती. त्यांच्या कन्येने मार्कंडेय रथोत्सवात हजेरी लावून सोलापूरच्या मातीत मिसळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सोलापुरात भाजप, काँग्रेस आणि बीआरएस असा तिरंगी सामना होईल, असा अंदाज होता. मात्र, आता सोलापूर लोकसभेसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात दुहेरी सामना होण्याची शक्यता आहे.