बीड : आमदार सुरेश धस यांच्या देवस्थान जमीन घोटाळ्यांसह गैरकारभाराची माहिती बाहेर काढणा-या आणि धस यांच्या विरोधात संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल करणा-या, सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांचे, कोर्टाने दिलेले पोलिस संरक्षण, कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक काढण्यात आले आहे. यामुळे माझे पोलिस संरक्षण पूर्ववत करण्यात यावे, माझ्या जीवितास आमदार सुरेश धस, पत्नी प्राजक्ता धस, देविदास धस यांच्यासह त्यांच्या दलालांकडून धोका आहे.
या अगोदरही माझ्यावर गुंडांकडून हल्ला करण्यात आला आहे, असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी आमदार सुरेश धस यांच्या गैरकारभाराचा पाढाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे. तसेच पोलिस संरक्षण पूर्वरत करा, अशी मागणी केली आहे.
राम खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आमदार सुरेश धस यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची, गुन्हेगारीची सर्व प्रकरणे उच्च न्यायालयात कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत. महसूल प्रशासन पोलिस प्रशासनामार्फत कायद्याने कोणतीही कारवाई होत नसल्याने, तपासात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने उच्च न्यायालयात री-पिटीशन दाखल केलेली आहे. या यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी, त्यांच्यावर दहशत ठेवण्यासाठी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या माध्यमातून पोलिसांची तपासाची भूमिका ते जाहीर सभेत मांडत आहेत. पोलिसांना अप्रत्यक्ष आदेश देत आहेत.
आमदार सुरेश धस हे देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्यांनी मीडियासमोर त्यांच्यावर झालेल्या सर्व आरोपातून क्लिनचिट देण्यात आली आहे, असं मीडियावर सांगून जनतेची आणि प्रशासनाची दिशाभूल केली आहे. पोलीस उपाधिक्ष, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांनी एफआयआरनुसार तपास केलेला नसताना, तपासासाठी वरिष्ठावरुन परवानगी मिळाली नसताना, त्यांना क्लिनचिट कोणी दिली? प्रकरणात देवेंद्र फडणवीस तत्कालीन गृहमंत्री यांना मदत करुन वाचवले आहे, हे जाहीर कबूल केले आहे.
देवस्थान इनाम जमीन घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे रि-पिटीशन नंबर १७४१/२०२३ जनहित याचिका क्रमांक ७३/२०२३ आणि उच्च न्यायालय मुंबई येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रि-पिटीशन २०२५ या तिनही याचिका न्यायप्रविष्ठ असून आमदार धस यांच्यांशी निगडित असल्याचे राम खाडे म्हणाले.