लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासह जिल्ह्यातील अवैध मद्यविक्री, वाहतूक व साठा करणा-यांविरोधात पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नियमित कारवाई होत असते. मात्र, अनेकदा कारवाईपूर्वीच संशयित अवैध मद्यसाठा सोडून पसार झाल्याच्याही नोंदी आहेत. पण जिल्ह्यात विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत एप्रील २०२४ पासून आतापर्यंत तब्बल ८५७ गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यांमध्ये ५९ वाहने जप्त करून ८९२ संशयितांना अटक केली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये अवैध मद्यसाठ्यांसह जप्त केलेल्या वाहनांनुसार १० कोटी ३४ लाख ९ हजार ४३४ रुपयांचा मुद्देमाल केवळ ९ महिन्यात हस्तगत करण्यात आला असून मागच्या वर्षापेक्षा यंदा राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सरस दिसून येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अवैध मद्यसाठाच्या गुन्ह्यांची नोंद होऊनही तपास रखडण्याचे प्रमाण वाढत असते. परंतु सन एप्रील २०२४ पासून आज तारखेपर्यंत दाखल ८५७ गुन्ह्यांतील सर्वाच्या सर्व ८९२ संशयित आरोपी अटक करण्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला यश आले आहे. दरम्यान, सन २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ झाली. तर नववर्ष स्वागता पुर्वी देखील अवैधरीत्या विक्री होणा-या मद्यसाठ्यावर उत्पादन शुल्क विभागाने नजर ठेवली होती. विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या काळात व यानंतर ही ग्रामीण पोलीस दलाच्या भरारी पथकांनी विविध ठिकाणी छापे मारून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. यासह अवैधरीत्या केलेला लाखो रुपयांचा मद्यसाठादेखील जप्त करण्यात आला.इतकेच नव्हे तर शहरातदेखील या स्वरुपाच्या कारवायांनी वेग धरला होता. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातही केवळ मागच्या ९ महिन्यांच्या कालावधीत १० कोटी ३४ लाख ९ हजार ४३४ रुपयांचा मुद्देमाल रुपयांचा अवैध मद्यसाठा,मुद्येमाल जप्त झाला आहे. तरीही जिल्ह्यात अवैध दारुविक्रीला चाप लावण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्कसह पोलिसांसमोर कायम आहे.