मुंबई : प्रतिनिधी
महायुतीचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे आडून बसले होते. त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा भाजपची योजना होती, असा खळबळजनक दावा शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तर विजय वडेट्टीवार यांनी, शिवसेनेत एकनाथ शिंदेंची महायुतीला गरज नाही, शिवसेनेला संपवण्यासाठी आता नवा उदय होईल, असे विधान केल्याने आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रात पालकमंत्रिपदावरून राजकारण सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेतही फुट पडल्याची चर्चा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानानंतर सुरू झाली आहे. त्यावर आता शिवसेना संजय राऊत यांनीदेखील एक मोठा दावा केला आहे. ‘उदय सामंत यांच्याकडे २० आमदार आहेत.’ असा दावा त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंऐवजी उदय उदय सामंत यांना घेऊन दावोसला गेले आहेत. उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार आहेत. विधानसभा निकालानंतर जेव्हा एकनाथ शिंदे रुसले, तेव्हाच हा उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि हे प्रकरण शांत झाले असे राऊत म्हणाले.
शिवसेनेचा नवा ‘उदय’ : विजय वडेट्टीवार
उद्धवजींना संपून शिंदेंना आणले, आता शिंदेंना संपून नवीन ‘उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल. ही शिवसेनेच्या बाबतीमध्ये सध्याची परिस्थिती आहे. कदाचित उद्याचा शिवसेनेचा नवा उदय होताना तुम्हाला दिसेल, ही शक्यता नाकारता येत नाही, याआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार केला होता.