जळकोट : प्रतिनिधी
जळकोट हा डोंगरी तालुका समजला जातो मात्र जळकोट शहरात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवा टेक्निशियन अभावी थंडावली आहे. जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गत एक वर्षापासून क्ष – किरण प्रतिमा मशीन टेक्निशियन नसल्यामुळे बंद आहे .
जळकोट येथे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालय मंजूर केले होते. यानंतर तत्कालीन आमदार चंद्रशेखर भोसले यांनी या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर केला होता. या ग्रामीण रुग्णालयामध्ये आवश्यक त्या आरोग्य सुविधाही निर्माण करण्यात आल्या होत्या. यामुळे जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरिबांना या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळू लागल्या होत्या. यानंतर टप्प्याटप्प्याने गोरगरिबासाठी एक्स-रे मशीन आणण्यात आली सोबतच रक्त तपासणीची सुविधाही करण्यात आली. याच ठिकाणी एक्स-रे काढणे सुरू झाले व रक्त तपासणी सुरू झाली . मात्र गत सहा महिन्यापासून जळकोट मधील एक्स-रे मशीन बंद अवस्थेत आहे.
जळकोट ग्रामीण रुग्णालयातील क्ष किरण मशीन टेक्निशियन चन्ना यांची एक वर्षापूर्वी नायगाव येथे बदली झाली. तेव्हापासून जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये एक्स-रे टेक्निशियन चे पद रिक्त आहे . क्ष – किरण मशीन प्रतिमा मशीन चालवण्यासाठी गत एक वर्षापासून जळकोट मध्ये टेक्निशियन नसल्यामुळे जळकोट येथील अपघातग्रस्त रुग्णांना उदगीर , लातूर किंवा खाजगी दवाखान्यामध्ये पाठवले जात आहे . सध्या जळकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये आठवड्यातून केवळ एक दिवस म्हणजे सोमवारी उदगीरचा टेक्निशियन येऊन एक्स-रे मशीन चालवतो इतर सहा दिवस मात्र एक्स-रे मशीन बंदच असते. जर सोमवार सोडून इतर वारी अपघात झाला. गोरगरीब व्यक्तीचा हात पाय मोडला तर अशा व्यक्तींनी एक्स-रे काढण्यासाठी कुठे जावे असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे .
जळकोटमध्ये असलेल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये एक्स-रे मशीन सुरू नसल्यामुळे नागरिकांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे . किंवा उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये जावे लागत आहे. जळकोट येथे तात्काळ एक्स-रे टेक्निशियन उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जळकोट तालुक्यातील नागरिकांनी केली आहे .