नवी दिल्ली : लैंगिक शिक्षणाबाबत मुलांशी बोलणे हा समाजात अद्यापही दुर्लक्षित मुद्दा आहे. पालक आपल्या पाल्यांना या विषयी बोलण्यास कचरतात. याविषयी पालक मोकळेपणाने बोलत नाहीत. असे असले तरी काही प्रमाणात आता जागरुकता निर्माण झाली आहे. काही पालक आपल्या पाल्याशी या विषयावर बोलू लागले आहेत.
पाल्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे कधीपासून द्यायचे असा प्रश्न पालकांना पडत असतो. याविषयी त्यांच्यामध्ये संभ्रम दिसून येतो. कोणत्या वयामध्ये मुलांना कशाप्रकारचे लैंगिक शिक्षण द्यावे हा प्रश्न पालकांना गोंधळात टाकणारा असतो. याविषयी तज्ज्ञ काय सांगतात हे आपण जाणून घेऊया. पाल्यांना कोणत्या प्रकारची आणि कोणत्या वयात लैंगिक माहिती द्यावी हे माहिती असायला हवे. नियती शर्मा यांनी एक लेख लिहिला आहे. शर्मा यांनी प्रतिसंधी नावाची एक एनजीओ सुरु केली आहे. ही संस्था नागरिकांना लैंगिक विषयासंबंधी माहिती देते. शर्मा यांचे म्हणणे आहे की, मुलांना कोणत्याही वयात लैंगिक शिक्षण दिले जाऊ शकते.
५ वर्षांच्या मुलांना काय द्यावे शिक्षण?
५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श याबाबत माहिती द्यायला हवी. त्यांच्या आवडत्या कार्टुन कॅरेक्टरच्या मदतीने त्यांना भावनांची माहिती दिली जाऊ शकते. जवळच्या व्यक्तीने आंिलगन दिल्यानंतर वाटणारे प्रेम आणि बागेत एकटे असताना अनोळखी व्यक्तीने केलेला स्पर्श यातील फरक मुलांना कळत असतो. दुस-या प्रकारच्या स्पर्शाबाबत त्यांच्या मनात भीती असते. त्यामुळे याबाबत त्यांनी माहिती दिली जाऊ शकते.
मुलगा-मुलगी फरक सांगता येईल
जेव्हा मुले पाच ते दहा वर्षांचे होतात त्यांना सरळ शब्दांमध्ये मुलगा आणि मुलगी यामधील फरक सांगता येईल. मुले मोठे होत असताना त्यांच्या शरीरात बदल होत जातात आणि ते भविष्यात आई-वडील होऊ शकतात अशी माहिती मुलांना देता येईल. कोणालाही लैंगिक अवयवांना स्पर्श करण्याची परवानगी देऊ नका असेही मुलांना सांगायला हवे असे कोणी केले तर मोठ्यांना सांगण्याचा सल्ला त्यांना दिला पाहिजे
१० ते १३ वर्षांच्या मुलांना काय द्यावे शिक्षण?
मुल जेव्हा १० ते १३ वर्षांचे होते. तेव्हा त्याला तारुण्याबद्दल माहिती देणे आवश्यक होते. या वयात मुलांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. त्यांना शारीरिक आणि मानसिक बदलांबाबत माहिती द्यावी. लैंगिक संबंध आणि इतर गोष्टींची माहिती द्या. तसेच सुरक्षित लैंगिक संबंधाबाबत माहिती द्यावी. लैंगिक शोषणापासून संरक्षण आणि अशा समस्येला सामोरे गेल्यास आई-वडील किंवा शिक्षकांना कळवावे असा सल्ला त्यांना द्यावा. त्यांच्या प्रश्नांना कोणत्याही संकोचाशिवाय उत्तर द्यावे.