लातूर : प्रतिनिधी
जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार काही ठराविक लोकसंख्ये मागे एक सार्वजनिक स्वच्छतागृह असणे अनिवार्य आहे. परंतु लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील जवळपास दोन लाख ते अडीच लाख महिलांच्या लोकसंख्येमागे महिलांसाठी गंजगोलाईत केवळ एकच सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. तेही कधी चालु कर कधी कुलूपबंद त्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी १६ सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. परंतू, यापैकी बहुतांश स्वच्छतागृहे कुलुपबंदच असतात. या स्वच्छतागृहांचे लोकार्पण झाल्यानंतर काही दिवस ही स्वच्छतागृहे संबंधीत यंत्रणेने व्यवस्थित चालवली. नंतर मात्र अवकळा आली. स्वच्छतागृहे कधी चालु तर कधी बंद राहात आहेत. गंजगोलाई, जुने गुळ मार्केट चौक, उड्डाण पुलाखाली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, संविधान चौक ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एकुण १६ सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. मात्र यातील बहुतांश सार्वजनिक स्वच्छतागृहे कुलूप बंद असतात.
शहरातील उड्डाण पुलाखालील, जुने गुळ मार्केट, रेल्वे लाईन परिसरातील, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तर गंजगोलाईतील महिलांसाठीचे एकमेव असलेले स्वच्छतागृहा कुलुप बंद अवस्थेत आहेत. संविधान चौकातील स्वच्छतागृह कधी बंद तर करधी चालू असते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाण पुलाखालील स्वच्छतागृह कुलूपबंद असते. काही महिन्यांपासून स्वच्छतागृहांची सेवा विस्कळीत झालेली आहे. अस्वच्छता असून पाण्याची कमतरता आहे. सुलभ शौचालये शहरात असावीत म्हणून नागरिकांनी मागणी, आंदोलने केल्यानंतर काही वर्षांपुर्वी सुलभ शौचालये उभारण्यात आली आहेत. परंतु, आजघडीला सुलभ शौचालयांची दुवस्था झाली आहे.