नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आता बांगलादेशी आणि रोहिंग्या रडारवर असून, केंद्रीय गुप्तचर खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामी, या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या स्लीपर सेलचं नेटवर्क राज्यातील तब्बल २० जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर खात्यासह, राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. तपास यंत्रणा सक्रिय झाली असून, युद्धपातळीवर रोहिंग्या आणि बांगलादेशींचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्रातील जवळपास २० जिल्ह्यांमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र आणि दाखले वितरीत झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राज्यात जवळपास दीड ते दोन लाख बांगलादेशी घुसखोर असू शकतात, असा तपास यंत्रणेचा अंदाज आहे. या घुसखोरांना मदत करणारे स्थानिक आणि प्रशासनातील अधिकारी देखील आता सरकारच्या रडारवर असणार आहेत. बांगलादेशातील सत्ता बदलानंतर पुन्हा एकदा जमात-ए-इस्लामी संघटना कार्यरत झाली असून, या दहशतवादी संघटनेचा भारताला मोठा धोका असल्याचं गुप्तचर विभागानं म्हटलं आहे.
अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोरांकडून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशाने घुसखोरांच्या विरोधातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळे यांनी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या निवेदनात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) या संस्थेकडून घुसखोरांविषयी केलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला होता. शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडली असून गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या उद्भवल्या आहेत. काही राजकारण्यांकडून अशा घुसखोरांचे ‘वोट बँक’ म्हणून लांगूलचालन सुरू आहे. बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या या लोकांमुळे स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम होताना दिसत आहे, त्यानंतर आता रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.