18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeजळगावजवळ रेल्वेखाली चिरडून १२ प्रवासी मृत

जळगावजवळ रेल्वेखाली चिरडून १२ प्रवासी मृत

 

जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील रेल्वे अपघातातील मृत १२ प्रवाशांमध्ये ८ पुरुष, एक दहा वर्षीय बालक आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्वच मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले गेले आहेत. आतापर्यंत ५ मृतांची ओळख पटली आहे.

पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वेस्थानकावर समोरुन येणा-या रेल्वेखाली चिरडून १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटना अतिशय दुर्देवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेऊन असल्याचे स्पष्ट केले.

जळगाव स्थानकावरुन दुपारी ४ वाजता पुष्पक एक्स्प्रेस पाचो-याच्या दिशेने निघाली. माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली. त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वेगाडीने अचानक ब्रेक दाबायला सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेरुळांवर ठिणग्या उडत गेल्या. परधाडे स्टेशनवर रेल्वेगाडी थांबली. तेव्हा एका बोगीतील प्रवाशांना या ठिणग्या दिसल्यावर बोगीत आग लागली असावी, या शक्यतेने ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले, एवढ्यात समोरुन वेगात कर्नाटक एक्स्प्रेस आली. त्यावेळी रुळावरच्या प्रवाशांची धावाधाव सुरु केली असतानाच काहीजणांनी उड्या घेतल्या आणि ते रेल्वेखाली चिरडले गेले.

दुर्दैवी घटना : देवेंद्र फडणवीस
घटना अतिशय दुर्देवी आणि वेदनादायी आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे.

मदत कार्य सुरू : गिरीश महाजन
माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलो आहे. सद्यस्थितीत कार्यकर्त्यांच्या मदतीने मदतकार्य हाती घेतले आहे. मयत व जखमींच्या आकड्याविषयी अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनच जाहीर करणार आहे.

रेल्वेतर्फे अपघात प्रकरणी तातडीची मदत जाहीर

रेल्वेतर्फे अपघात प्रकरणी तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. यात मृतांच्या कुटुंबियांसाठी 5 लाखांची मदत जाहिर करण्यात आली आहे, गंभीर जखमींसाठी 50 हजार, तर कायम अपगंत्व आलेल्या व्यक्तींसाठी 2 लाख 50 हजार रुपयांची मदत जाहिर करण्यात आली आहे. दरम्यान अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदतकार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR