18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeउद्योग१५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार

१५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार

दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार; रिलायन्स, ऍमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होणार

 

 

दावोस : वृत्तसंस्था
दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुस-या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल.

आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते ३,०५,००० कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून ३ लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे.
रिलायन्स समूहासोबत ३ लाख ५ हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे ३ लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.

दुसरी मोठी गुंतवणूक ही ऍमेझॉन करणार असून, ती ७१,७९५ कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून ८३,१०० इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या २ दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने ११.७१ कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने ३.४४ लाख कोटी तर सिडकोने ५५,२०० कोटींचे करार केले आहेत.

टोनी ब्लेअर यांची भेट
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ुंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR