बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्याकांडातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यासह सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात आरोपींना आता अगदी राजा- महाराजासारखी ट्रीटमेंट मिळायला ते आता मोकळे झाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान,
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आरोपींना कालच न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता या आरोपींना न्यायालयाच्या देखरेखीखाली पोलिसांना त्यांची रोज चौकशी करावी लागणार आहे. या संदर्भात हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणा-या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात न्यायालयीन कोठडी इतक्या लवकर दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या की पीडित संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक व्हीडीओ आपल्याला पाठवला आहे. तो व्हीडीओ पाहिल्यानंतर मला खूप राग आला आहे. आपली सिस्टीम इतकी सडली आहे. पोलिस प्रशासन काम करीत नाही.
धनंजय देशमुख यांनी मला एक व्हीडीओ पाठवला आहे. तो व्हीडीओ पाहिल्यानंतर मला इतका राग आला. आपली सिस्टीम किती सडली की कोणीच काम करत नाहीयेत. पोलिस, प्रशासन कोणीच काम करत नाही. आरोपी कुठे गेले होते याची माहिती सीसीटीव्हीत कैद झाल्याची ही माहिती आहे. या व्हीडीओचा उल्लेख देखील पीसीआरमध्ये नाही असाही त्रागा त्यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी तपास संपला म्हणून सांगितलं. नंतर न्यायालयाने त्या महाशयांना न्यायालयीन कोठडी दिली. या आरोपीला मी केव्हा बेड्यात पाहिलेले नाही. ते राजा-महाराजा नाहीत, गुन्हेगार आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त आहे. सर्वांना पत्र लिहून देखील त्यांचा वरदहस्त संपत नाही. हे सर्व पाहून माझे डोके दुखत आहे.
पोलिसांना आणि इतरांना काही कळत नाही. सगळ्यांना सर्व माहिती आहे की हा सराईत गुंड आहे, कसे बीडला लुटले, कशी संपत्ती मिळविली सर्वांना माहिती आहे.
भुजबळ यांना कशी कळ यायची?
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना आता वैद्यकीय कारणाखाली जामिनावर जायचे आहे. भुजबळांना कशी जेलमध्ये असताना छातीत कळ यायची. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतील, एसीमध्ये बसवतील आणि लोक येऊन त्यांना भेटतील. याचीच भीती होती मला आणि हळूहळू मेडिकल बेल मिळण्याची भीती होती तसेच होणार असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.