नांदेड : प्रतिनिधी
लिंबोटी येथून गायब झालेल्या ८ वर्षीय बालिकेला पोलिसांनी ४८ तासांत शोधून काढत तीन आरोपींना अटक केली असून सदर बालिका नरबळी देण्यासाठी गायब करण्यात आली होती अशी चर्चा आहे. परंतू पोलिसांच्या सर्तकतेने हा प्रयत्न फसला. दरम्यान न्यायालयाने या प्रकरणी अटक केलेल्या तिघांना पोलिस कोठडीत पाठविले आहे.
मोहिजा परांडा या गावातील एक ८ वर्षीय बालिका लिंबोटी येथे आपल्या मामाच्या घरी आली होती. दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ती मामाचे गाव मोहिजा परांडा येथून गायब झाली. या प्रकरणी माळाकोळी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) नुसार गुन्हा क्रमांक १५/२०२५ अज्ञात आरोपीविरुध्द दाखल करण्यात आला.
पोलिसांनी काढलेल्या माहितीनुसार आणि विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मोहिजा परांडा गावातील शेषराव गणपती गायकवाड याच्या घरी ती ८ वर्षीय बालिका असल्याची माहिती प्राप्त केली. त्यानंतर पोलीसांनी शेषराव गणपती गायकवाड(६०), त्यांची पत्नी शोभाबाई शेषराव गायकवाड (५५) या दोघांचा मुलगा चंद्रकांत शेषराव गायकवाड अशा तिघांना अटक केली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या बालिकेचे अपहरण नरबळी देण्यासाठी करण्यात आले होते अशी चर्चा आहे.
पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून तपासाच्या सूचना दिल्या तर अतिरिक्त पोलिस अधीक्षक खंडेराय धरणे, कंधारचे उपविभागीय अधिकारी जगताप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक उदय खंडेराय, माळाकोळीचे सपोनि संजय निलपत्रेवार, उपनिरीक्षक राणी भोंडवे आणि त्यांच्या सहकारी पोलिस अंमलदारांनी ही कारवाई पुर्ण केली. दरम्यान न्यायालयाने या तीनही आरोपींना पोलिस कोठडीत पाठविले आहे.