श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंजाबमधील मानसा येथील एक अग्निवीर जवान शहीद झाला. कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मानसा गावातील अकालिया येथील २४ वर्षीय अग्निवीर जवान लवप्रीत सिंग शहीद झाला आहे.
गुरूवारी दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोहोचले होते. तो दोन भावांमध्ये सर्वात लहान होता आणि त्याचे अजून लग्नही झालेले नव्हते. लवप्रीतच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वी आईशी फोनवर बोलणे झाले होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आपला मुलगा शहीद झाल्याची बातमी ऐकून कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लवप्रीत दोन वर्षांपूर्वी अग्निवीर योजनेंतर्गत भारतीय सैन्यात दाखल झाला होती. लवप्रीत मीडियम रेजिमेंट युनिटमध्ये तैनात होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी लवप्रीतने त्याच्या पालकांशी बोलून त्यांना आपल्या कामाबद्दल सांगितले होते. लवप्रीतची कौटुंबिक पार्श्वभूमीही लष्कराशी संबंधित आहे. तरुण मुलाच्या निधनाने सिंग कुटुंबात मात्र शोककळा पसरली आहे.