मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने दावोस येथे २९ कंपन्यांसोबत गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले. यातील फक्त एक कंपनी परदेशातील असून उर्वरित २८ कंपन्या भारतीय आहेत. २८ पैकी २० कंपन्या महाराष्ट्रातील असताना गुंतवणुकीचे सामंजस्य करार दावोसला करण्याची गरज काय? असा सवाल करत विरोधी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौ-यावर टीकास्त्र सोडले आहे.
दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस २० जानेवारीला दावोसच्या दौ-यावर रवाना झाले. गेल्या चार दिवसाच्या दौ-यात फडणवीस यांनी विविध उद्योजक आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. मात्र, या दाव्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्रातील किंवा भारतातील कंपन्यांसोबत दावोस येथे करार करण्याऐवजी हे सामंजस्य करार महाराष्ट्रात आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारख्या कार्यक्रमाद्वारे का केले गेले नाहीत? दावोससारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राज्याच्या जागतिक संबंधांची बांधणी होऊ शकते. मात्र, मुख्यमंत्री हा वेळ आंतरराष्ट्रीय नेते, उद्योजक आणि कंपन्यांसोबत संबंध प्रस्थापित करण्याऐवजी देशांतर्गत कंपन्यांसोबत करार करण्यात व्यस्त राहिले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी आज एक्स या समाज माध्यमातून केली. तर, महाराष्ट्रासोबत करार करणा-या एकूण २९ कंपन्या आहेत. यापैकी २८ कंपन्या भारतातील असून त्यातील २० तर महाराष्ट्रातील निघाल्या. या २० पैकी १५ मुंबई, ४ पुणे तर एक ठाण्यातील आहे. मग दावोस दौरा कशासाठी? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे. दावोसमध्ये वर्धन लिथियम कंपनीशी झालेला सामंजस्य करार हा अस्तित्वात कधी येणार? या कंपनीचे भांडवल सध्या किती आहे? ही कंपनी ४२ हजार ५३५ कोटी रुपये गुंतवण्याची आर्थिक ताकद ठेवते का? ही कंपनी एनकॉर्पोरेट कधी झाली? असे सवालही दानवे यांनी केले आहेत.
जनतेचे करोडो रुपये खर्च करून दावोसला गेले आणि भारतीय कंपन्यांशी गुंतवणुकीचे करार केले. आता या सर्व कंपन्यांचे मुख्यालय मुंबईतच आहेत. मंत्रालयात बसून हे करार झाले असते की! रिलायन्सच्या अनंत अंबानींना मंत्रालयातून धन्यवाद देतात आले असते की! पण दिखावा, खोटेपणा हा या महायुती सरकारच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक्स या समाज माध्यमातून केली आहे.