मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गेल्या २३ दिवसांत ११ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वन विभागाने गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. १ जानेवारी २०२५ पासून पाच वाघांचा नैसर्गिक तर ३ वाघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अन्य ३ वाघांची शिकार करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरु असल्याचे वन विभागाने पत्रकात म्हटले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि वनपरिक्षेत्रात २ जानेवारी २०२५ रोजी वाघांच्या आपसातील हल्ल्यात मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात ६ जानेवारीला एका वाघिणीचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. या वाघाच्या शिकारीत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पांढरकवडा वनविभागांतर्गत वणी येथे ७ जानेवारीला एका वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून या वाघिणीचे दात, पंजे गायब असल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूरच्या देवलापार वनपरिक्षेत्रात ८ जानेवारीला एका बछड्याचा विजेचा धक्का देऊन मृत्यू झाला असल्याचे आढळून आल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र वनक्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्रात ९ जानेवारी रोजी एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.
गोंदिया येथील दासगाव वनपरिक्षेत्रात १४ जानेवारी रोजी आजारपणामुळे एका वाघाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूर येथील देवलापार वनपरिक्षेत्रात १५ जानेवारीला एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सिंदेवाही वनपरिक्षत्रात १९ जानेवारी रोजी रेल्वेला धडकून अपघात झाला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प शिवणी वनपरिक्षेत्रातील एका बछड्याचा २० जानेवारीला नैसर्गिक मृत्यू झाला. तर २१ जानेवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प नागलवाडी वनपरिक्षेत्रात एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तसेच वर्धा वनविभागातील समुद्रपूर येथे एका बछड्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असून शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे वन विभागाने कळविले आहे.