लातूर : प्रतिनिधी
लोकशाही व संविधानातील मुल्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे तसेच सामान्यांच्या हितासाठी लोकशाही जपणे गरजेचे आहे, ही बाब लोकांपर्यंत जावी, या हेतूने लातूरकर यावर्षीपासून ‘लोकशाही उत्सव’ साजरा करणार आहेत. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत झेंडावंदन, संविधान फेरी, चित्रपट, नाटक, कथाकथन, वृक्षारोपण, तरुणांशी संवाद असे विविध कार्यक्रम शहरात होणार आहेत.
लोकशाही उत्सव समिती, लातूर कलामंच, नारी प्रबोधन मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातूर वृक्ष चळवळ, ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प, सावली हॉस्पिटल, हरिती बुक गॅलरी, लातूर आदी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. इतर अनेक शासकीय व निम शासकीय संस्था तसेच शाळा, महाविद्यालये यात सहभागी होणार आहेत.
लोकशाही उत्सवातील ठळक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत्. २६ जानेवारी रोजी, माझं घर, बुधोडा; लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालय, फत्तेपूर; नारी प्रबोधन मंच, लातूर व बालभवन औसा व लातूर येथे सर्वसामान्य महिलांच्या हस्ते झेंडावंदन होईल, तर सायंकाळी ६ वाजता मेंढा-लेखा या आदिवासी गावावर आधारित ‘दिशा स्वराज्याची’ ही डॉक्यूमेंटरी दाखवली जाणार आहे. हा कार्यक्रम श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या कस्तूर-कंचन सभागृहात होईल. दिग्दर्शक वीरेंद्र वळसंगकर याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका हरिती बुक गॅलरीत उपलब्ध आहेत.
२७ जानेवारीला ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे ‘भारतीय लोकशाही व संत विचार’ या विषयावर प्रवचन होईल. हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प, नवीन इमारत, प्रकाशनगर, लातूर येथे होईल. २८ जानेवारी रोजी पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, लातूर येथे सायंकाळी ४ वाजता ‘संवाद तरुणांशी’ हा कार्यक्रम होईल. ‘दैनंदिन जीवनातील लोकशाही’ या विषयावर प्राचार्य सविता शेटे प्रा अनिल जायभाये तरुणांशी संवाद साधतील.
२९ जानेवारी रोजी ‘दास्तानगोई’ हा अक्षय शिंपी व नेहा कुलकर्णी यांचा कार्यक्रम होईल. दास्तानगोई म्हणजे उर्दू भाषा परंपरेतील मौखीक कथाकथनचा प्रकार आहे. या दोघांनी तो यशस्वीपणे मराठीत आणला आहे. हा एक आगळावेगळा कार्यक्रम लातुरकरांसाठी होणार आहे. हा कार्यक्रम कस्तूर-कंचन सभागृहात सायंकाळी ६ वाजता होईल. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका हरिती बुक गॅलरीत उपलब्ध आहेत. ३० जानेवारी रोजी ‘हुतात्मा’ दिनानिमित्त महात्मा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे सकाळी संविधान फेरी व वृक्षारोपण होणार आहे. तर सायंकारी ५ वाजता समाजकल्याण मुलांमुलींच्या वसतिगृहात ‘तरुणाईचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर डॉ. अशोक नारनवरे व डॉ. निशिकांत वारभुवन तरुणांशी संवाद करतील. या लोकोत्सवात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकशाही उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे व समन्वयक डॉ. गणेश गोमारे तसेच समितीतील सर्व संयोजकांनी केले आहे.