सोलापूर – नागपूर-गोवा जाणारा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरुपी रद्द करावा या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील बाधीत गावांचे शेतकरी धरणे आंदोलनास बसले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे हे धरणे आंदोलन सुरु असून यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील बार्शी, उ.सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, सांगोला या भागातून हा महामार्ग जात असून यात शेतकऱ्यांची बागायत जमिनी जाणार आहे. आम्ही शेतकरी आधिच अल्पभूधारक असून त्यात अनेकजणांची पूर्ण जमीन जात आहे. जिल्ह्यातील ९० टक्के शेतकरी या महामार्गाच्या विरोधात असल्यानं हा महामार्ग पूर्णतः रद्द करावा अस शेतकऱ्यांच म्हणणे आहे.
बहुचर्चित असणारा शक्तिपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरातून जाणार आहे. या भागात धरणग्रस्त, बाधित लाभ क्षेत्र असल्याने शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तर महामार्ग दुसरीकडून घेऊन जावे, अशी मागणी केली आहे. त्यातच आता शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीचे भूसंपादन होणार असल्याने शेती जाणार आहे. शक्तिपीठ महामार्गास वेगवेगळ्या जिल्ह्यातून विरोध होत असतानाच सोलापुरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
सोलापुरातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने जर यावरती तोडगा काढला नाही; तर शेती मोजण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्याला शेतात पाऊल ठेवू देणार नाही. तसेच पुढील काळात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आंदोलनात गणेश घोडके, राहुल भड, विजयकुमार पाटील, हणमुत जाधव, अप्पा पवार, दत्ता काकडे, आदी सहभागी झाले आहेत.