लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरात एकाचवेळी थेट १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी, शेतक-यांसाठी, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत जाचक आहे. राज्य सरकारने पुनर्विचार करून राज्यातील जनतेवर लादलेला निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली.
एसटीच्या तिकीटांची भाडेवाढ राज्यात आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे शहरातील आणि खेडोपाड्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याची दखल घेत लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत एसटीची भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.
राज्याच्या प्रमुखांना (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री) विचारात न घेता, मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा न करता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारा जाचक निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले भाव यामुळे सर्वसामान्य माणूस आधीच त्रासलेला आहे. शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही. याचा विचार न करता एसटी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.