29.9 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्रशासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वर्षे करा

शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वर्षे करा

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वर्षे करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाने पुन्हा एकदा उचलून धरली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. निवृत्तीचे वय ६० करण्यासाठी सचिव कमिटीमार्फत मंत्रीमंडळाकडे करण्याची शिफारस करण्यात येउनही याप्रकरणी होणारा विलंब हा अनाकलनीय आणि निराशाजनक असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

तर शासनाच्या या दिरंगाईमुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये नाराजीची भावना व्यक्त केली जात असून आंदोलनाचा इशारा यावेळी महासंघातर्फे देण्यात आला असल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी दिली आहे.
यासंदर्भात अधिकारी महासंघातर्फे सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी वरील नाराजी व्यक्त केली आहे. या मागणीबाबत वारंवार सकारात्मक चर्चा होऊन देखील याबाबतच्या निर्णय न घेण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनातील चतुर्थश्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या ६० वर्षे आहे, तर केंद्र शासनामध्ये १९९८ पासून तसेच तब्बल २५ घटक राज्यांमध्ये देखील ६० वर्षे आहे. महाराष्ट्र राज्यात नियुक्तीची वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी ३८ वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे अशी असतांना, निवृत्ती वय ५८ वर्षे असणे ही बाब अत्यंत अव्यवहार्य असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले आहे.

तर अंदाजित सर्वेक्षणावरुन, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे केल्यास तातडीचा आर्थिक भार कमी होऊन, शासनास सद्यःस्थितीत दोन वर्षांसाठी केवळ शासकीय नोकरांच्या निवृत्ती लाभापोटी द्यावयाची रु. २५ हजार कोटी इतकी रक्कम राज्याच्या विकासाकरिता तातडीने उपलब्ध होईल. त्याबरोबरच, प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची सेवा देखील उपलब्ध होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR