25.4 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्रसंबंध नसलेल्यांवर कारवाई नाही

संबंध नसलेल्यांवर कारवाई नाही

अजित पवारांकडून मुंडेंची पाठराखण, म्हणाले, दोषींना फाशी व्हावी दमानियांनी दिलेली कागदपत्रे मुख्यमंत्र्यांकडे सोपविली

मुंबई : प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणी ज्याच्या कोणाचा संबंध असेल अशा कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, ही माझी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भूमिका आहे. जर या प्रकरणात कोणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अंजली दमानिया यांनी दिलेली कागदपत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली. चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असा आमचा प्रयत्न असल्याचेही अजित पवार म्हणाले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धस यांनी लावून धरले आहे. दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेऊन या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे अजित पवार यांना सोपविली आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. अंजली दमानिया यांनी आपल्याला दिलेली कागदपत्रे मुख्यमंत्री फडणवीस यांना सोपविली आहेत. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही कागदपत्रे दिली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती एसआयटी आणि सीआयडीकडे दिली आहेत. जे कोणी दोषी आढळतील, त्यांना फाशीच झाली पाहिजे. मात्र, या प्रकरणाशी ज्यांचा संबंध नाही, त्यांच्यावर कारवाईचा प्रश्न येत नाही, असे अजित पवार म्हणाले.

धस यांना काय वाटते त्याच्याशी देणे-घेणे नाही
सुरेश धस यांच्या आरोपांबाबत काय वाटते? असे पत्रकारांनी विचारले असता धस यांना काय वाटते याच्याशी मला देणे-घेणे नाही. मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो. महायुतीचे सरकार योग्य प्रकारे काम करावे, यासाठी आम्ही नेते बसून निर्णय घेत असतो. वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला अंत उरणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR