23.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्रचिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित; पशुसंवर्धन उपायुक्तांची माहिती

चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित; पशुसंवर्धन उपायुक्तांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. उकळलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात समाज माध्यमांवर फिरणारे संदेश व काही माध्यमातून आलेल्या चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका. चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित असल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.

यासंदर्भात आज पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी एक निवेदन जारी केले आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या आजारा संदर्भात अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बर्ड फ्लूची लागण नाही
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील केवळ किवळा या एका गावामध्ये काही पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूसदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. या ठिकाणी तातडीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण नाही, असा खुलासा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी केला आहे.

४५६ पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट
किवळा या गावी साधारणत: २० तारखेच्या आसपास एका पशुपालकाच्या कुक्कुट पक्ष्यांमध्ये मृत पक्षी आढळून आल्याने त्याचे नमुने राज्य व राष्ट्रस्तरीय प्रयोगशाळेत निदानासाठी पाठविले होते. या प्रयोगशाळेतील बर्ड फ्लूसाठीचे नमुने पॉझिटिव्ह दिसून आल्यानंतर या गावामधील १ किमी परिघाच्या क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहेत. त्यामध्ये साधारणपणे ३८२ मोठे पक्षी आणि ७४ छोटे पक्षी असे एकूण ४५६ पक्षी नष्ट केले आहेत.

सतर्कता क्षेत्र घोषित
त्याचबरोबर संसर्ग झालेल्या १ किमी क्षेत्राबाहेरील बाधित क्षेत्राच्या १० किमी अंतरापर्यंत आपण सतर्कता क्षेत्र घोषित केले आहे. त्या क्षेत्रातील जितके कुक्कुट पक्षी आहेत त्याचे नमुने दर १५ दिवसाला पुढील ३ महिन्यांपर्यंत प्रयोगशाळेकडे पाठवून त्याचे निदान केले जाणार आहे. त्या पक्ष्यांमध्ये जर आपल्याला परत लक्षणे आढळून आली तर त्यावरही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाणार आहे.

चिकन, अंडी हे शंभर टक्के सुरक्षित
बर्ड फ्लू आजार केवळ स्थलांतरण झाले तर पक्ष्यांमध्ये पसरतो. त्यामुळे स्थलांतरण रोखणे त्यावरचा प्रमुख उपाय असतो. जिथे हा रोग आढळून येतो, तिथले कुक्कुटपालन ३ महिन्यांसाठी थांबविण्यात येते. त्यामुळे या रोगाचा प्रसार निश्चितपणे थांबवता येते. नागरिकांनी यासंदर्भात निर्धास्त असावे. आपण खात असलेले चिकन, अंडी हे शंभर टक्के सुरक्षित आहेत, याचीही खात्री प्रत्येक नागरिकाने बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR