मुंबई : प्रतिनिधी
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली असून यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री असतील त्यांनी पक्षाच्या आणि मताच्या मार्केटिंगकडे लक्ष देण्यापेक्षा भक्तांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोट्यवधी लोकांची आम्ही कशी व्यवस्था केली आहे अशा प्रकारचे मार्केटिंग भाजप आणि उत्तर प्रदेश सरकार करत होते. पण कुंभ हा मार्केटिंगचा विषय नाही, ज्यांची श्रद्धा आहे, आस्था आहे ते वर्षानुवर्षे कुंभला जात आहेत. कोट्यवधी लोकांचे आकडे दिले जात आहेत. इतके लोक आले, तितके लोक आले. सामान्य माणसांना दहा-दहा किलोमीटर चालावे लागत आहे. शेवटी आज दुर्दैवाने चेंगराचेंगरी झाली, माणसं तुडवली गेली आहेत, शेकडो लोक जखमी आहेत.दहापेक्षा जास्त श्रद्धाळूंना आपले प्राण गमवावे लागले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री असतील त्यांनी पक्षाच्या आणि मताच्या मार्केटिंगकडे लक्ष देण्यापेक्षा भक्तांच्या व्यवस्था आणि सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पंतप्रधान लक्ष देऊन आहेत म्हणजे काय? आज १४ श्रद्धाळूंचे प्राण गेले. त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या. प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय, गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय? ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
श्रेयवादात सरकार व्यस्त
या व्यवस्थापनामध्ये इतर पक्षाच्या लोकांना देखील सहभागी करून घेतले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती; पण श्रेयवाद आहे. या श्रेयवादातून लोकांना प्राण गमवावे लागले. दहा हजार कोटींपेक्षा जास्त बजेट यासाठी दिले गेले पण प्रत्यक्षात दहा हजार कोटी दिसत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.