27.9 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeमहाराष्ट्रसत्तारांच्या काळातील कामांची चौकशी करा

सत्तारांच्या काळातील कामांची चौकशी करा

पालकमंत्री संजय शिरसाट यांचे आदेश कोणालाच सोडणार नाही

छत्रपती संभाजीनगर : माजी पालकमंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांची, असमान व अखर्चित निधी प्रकरणी प्रशासनाकडून माहिती मिळाल्यानंतर चौकशी करण्यासह जिल्ह्यातील गुंडगिरीचा नायनाट करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांना संयुक्तपणे कारवाईचे आदेश दिल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी डीपीसीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बीडमध्ये ७३ कोटी रुपयांच्या अनियमित कामांबाबत चौकशी होणार आहे, येथेही तशीच चौकशी करणार काय, यावर पालकमंत्री शिरसाट म्हणाले, अनियमित कामांची चौकशी करण्यात येणारच आहे. त्यात कुणालाही सोडणार नाही. आ. सत्तार आणि तुमच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा आहे, याबाबत वरिष्ठांनी काही सूचना दिल्या काय, यावर शिरसाट म्हणाले, वरिष्ठांनी काहीही सूचना दिल्या नाहीत. दिलजमाई, खेळीमेळीचे वातावरण असा मुद्दा नाही. चांगल्या कामात अडचण आणू नये, सर्वांनी सहकार्य करावे, अशा खेळीमेळीच्या वातावरण विनावाद बैठक झाली. एकाच तालुक्याला जास्त निधी दिला गेला, तत्कालीन पालकमंर्त्यांचे निर्णय, त्यांनी दिलेल्या मंजु-यांबाबत काय निर्णय घेतला, असे विचारता शिरसाट म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून अहवाल आल्यानंतर ज्या कामांबाबत संशय आहे, त्याची निश्चितपणे चौकशी करण्यात येईल. अखर्चित, असमतोल निधीबाबत चौकशी होईल. यावर विरोधी पक्षासह सर्व आमदारांनी चर्चा केली.

गुंडगिरीचा नायनाट करणारच
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्तांना आज स्पष्टपणे आदेश दिले आहेत. संयुक्त कारवाईसाठी सूचना केल्या आहेत. यात अमली पदार्थ, पत्त्याचे क्लब, वाळूमाफिया, गांजा, बटनविक्री, चरस विक्रीबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. शहरासह जिल्ह्यात क्राइम वाढत आहे.

आ. सत्तारांचा काढता पाय
पालकमंत्री शिरसाट यांनी तुमच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करण्यासह सिल्लोडसह जिल्ह्यातील गुंडगिरी संपविण्याबाबत चंग बांधला आहे. त्याचे पडसाद आजच्या बैठकीत उमटले काय, यावर आ. अब्दुल सत्तार म्हणाले, सर्व काही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. गुंडगिरी, चौकशी यावर नो कॉमेंट्स म्हणत आ. सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून काढता पाय घेतला.

प्रशासकीय अधिका-यांची धाकधूक
पालकमंत्री होण्यापूर्वी शिरसाट यांनी सिल्लोडसह जिल्ह्यातील गुंडगिरी संपविण्याची व डीपीसीतील कामे रद्द करण्यासह गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यावर आ. सत्तार यांनी शहरात मेळावा घेत जशास तसे उत्तर दिले होते. आ. सत्तार पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी शिरसाटांना डिवचले होते. शिरसाट पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनीही वचपा काढण्यासाठी आरोपांचे बाण सत्तारांवर डागले. त्यामुळे गुरुवारी होणा-या बैठकीत शिरसाट आणि माजी पालकमंत्री आ. सत्तार यांच्यात खडाजंगी होईल, अशी शक्यता होती. यामुळे प्रशासकीय अधिका-यांमध्येही धाकधूक होती. परंतु, बैठकीत कोणताही वाद झाला नाही. तीन तास बैठक शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR