पुणे : प्रतिनिधी
इंग्लंडने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांत दमदार सुरुवात केली. पण तरीही अखेर त्यांना चौथ्या टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. भारताने संयमी खेळ करत फक्त चौथा टी २० सामनाच नाही तर मालिकाही आपल्या नावावर केली. आतापर्यंतच्या चारपैकी तीन सामने जिंकत भारताने या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी मोक्याच्या क्षणी अर्धशतके झळकावली. त्यामुळे भारताचा विजय सुकर झाला.
शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या या जोडीने मोक्याच्या क्षणी धडाकेबाज खेळी केल्याने भारताला प्रथम फलंदाजी करताना १८१ धावा करता आल्या. भारताच्या १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची दमदार अर्धशतकी सुरुवात झाली होती. पण त्यानतर इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि भारताने इंग्लंडवर १५ धावांनी विजय साकारला.
इंग्लंडचा संघ सामना जिंकेल, असे वाटत असतानाच रवी बिश्नोईने प्रथम बेन डकेटला बाद केले. त्यानंतर जोस बटलरला दोन धावांवर बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. पण त्यानंतर हॅरी ब्रुक हा भारताच्या विजयात मोठा अडसर बनलेला होता. पण त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने झुकला. पुढे भारताचा विजय सुकर होत गेला.
प्रथम फलंदाजी करताना भारताला दुस-याच षटकात तीन धक्के बसले आणि भारताचा डाव गडगडेल, असे चित्र होते. कारण इंग्लंडच्या साकिब महमूदने एकाच षटकात तीन बळी घेतले होते. परंतु रिंकू सिंगने यावेळी भारताला या पडझडीतून बाहेर काढले. त्याने ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३० धावांची दमदार खेळी साकारली. त्यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांची दमदार भागीदारी झाली. त्यामुळे भारताला धावांचा डोंगर उभारता आला.