नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहारमध्ये यावर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीचे पडसाद केंद्रीय अर्थसंकल्पात देखील उमटले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये सुरुवातीलाच बिहारला गिफ्ट दिले.
बिहारमध्ये मखनाचे उत्पादन आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, अशी घोषणा सीतारमण यांनी केली. सीतारामण यांनी यावेळी सांगितले की, उत्पादन, मुल्यवर्धन आणि मार्केटींगमध्ये सुधारणा होण्यासाठी मखना बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. मखना लागवड करणा-या शेतक-यांना या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधित शासकीय योजनांचा लाभही शेतक-यांना दिला जाईल.
अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, उच्च उत्पन्न देणा-या बियाण्यांचे राष्ट्रीय अभियान सुरू केले जाईल. बिहारमधील शेतक-यांना या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाटणा विमानतळाचा विस्तार करण्याची घोषणा देखील केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.
बिहारमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेची स्थापना केली जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये केली. बिहारमध्ये रोजगाराच्या संधी कमी आहेत. राज्यातील रोजगारामध्ये वाढ करण्यासाठी ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.