शिरूर अनंतपाळ :शकील देशमुख
समाज बदलतो तशी माध्यमे सुद्धा बदलतात, आज समाजमन बदललं तस माध्यमं देखील बदलली आहेत. त्यात राजकारणात चांगली माणसं यावी, मात्र आली तर त्याला लोक निवडून देत नाहीत. त्यामुळे निवडणुकीत चांगली माणसं निवडून येणार की नाही असा प्रश्न पडत असून साहित्यिकांनी आपली प्रतिभा सामाजिक पतन थांबविण्यासाठी वापरावी व आज संक्रमणाच्या काळात याची अधिक गरज आहे. असे मत प्रसिद्ध साहित्यिक व संमेलनाध्यक्ष देवीदास फुलारी यांनी व्यक्त केले.
‘साहित्य संस्कृती संवर्धन मंडळ, मराठवाडा साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने शहरातील देविसिंह चौहान मोरया लॉन्स येथे आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनात संमेलनाध्य म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डॉ.अरविंद भातांब्रे,माजी संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक धनंजय गुडसूरकर, डॉ. मार्तंडराव कुलकर्णी, रामभाऊ तिरुके, मंजुषा कुलकर्णी, प्रभाकरराव कुलकर्णी, बीडिओ बी.टी. चव्हाण, मुख्याधिकारी दीपक भराट, नगराध्यक्षा सौ. मायावती धुमाळे, उपनगराध्यक्षा सौ. सुषमाताई मठपती, अॅड. जयश्रीताई पाटील, सौ.अर्पणा भातांब्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सकाळी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात श्री अनंतपाळ नुतन विद्यालय, श्री मन्मथस्वामी विद्यालय, जि.प.शाळा भोजराज नगर, जि. प. शाळा शिरूर अनंतपाळच्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीचे बसवेश्वर चौकात नगराध्यक्षा मायावती गणेश धुमाळे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यात विविध पोशाखातील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले होते. यानंतर रामकिशन गड्डीमे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शन करण्यात आले. उद्घाटक शिक्षण महर्षी प्रभाकरराव कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाचा हेतू विषद केला. पुरातन मंदिराचा वारसा लाभलेले शिरूर अनंतपाळ हे प्रतिभावंतांच गाव आहे. असे सांगत मातृभाषेचा जागर करताना भाषा संवंर्धन करणे गरजेचे आहे, असे मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितले.
सांस्कृतिक उपकृमाचे केंद्र शिरूर अनंतपाळ बनले असून गावाने सांस्कृतिक संस्कृती जपली आहे. साहित्य संस्कृती मंडळ खुप छान काम करत असून मराठवाडा साहित्य संमेलन घ्यायचं आहे. असे सांगत संमेलनाचे मावळते अध्यक्ष धनंजय गुडसूरकर यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून या कालावधीत केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. तर साहित्य माणसाला बौद्धीक मेजवानीचं काम करते, व यासाठी प्रभाकरराव कुलकर्णी यांचं मोठं काम आहे.यापुढील मराठवाड्याचे साहित्य संमेलन शिरूर अनंतपाळला घेण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचे मराठी साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके यांनी सांगितले. कार्यकृमाचे प्रास्ताविक साहित्य संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष बालाजी येरोळे यांनी केले तर सुत्रसंचालन इंजि. किरण कोरे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी व साहित्य प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.