बीड : प्रतिनिधी
मागील दोन वर्षांपासून बीडचे राजकारण ढवळून निघाले आहे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करण्यात आले असून मुंडेंवर आरोप देखील करण्यात आले. यावर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.
पंकजा मुंडे यांनी त्यांना कार्यकर्त्यांचे अपार प्रेम व पाठिंबा मिळाला असल्याचे कबूल केले आहे. त्याचबरोबर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत झालेला संवाद सांगितला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्यापेक्षा कुणी उंच झालं तरच तुमचं नेतृत्व करू शकेल. माझ्यापेक्षा मनाने उंच, शरीराने उंच, विचारांनी उंच, आचारांनी उंच असे नेतृत्व लाभो, अशा शुभेच्छा देखील पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत.
पुढे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. त्या म्हणाल्या की, ‘‘मला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये गोपीनाथ मुंडे दिसतात. माझं कौतुक गोपीनाथ मुंडे करायचे, तुम्हीही करता. बाकी कुणी केलं नाही. मुंडे साहेब विचारायचे, पंकजा आली का? कशी चालली, कशी बोलली? माझ्यासारखी बोलते का? एक दिवस मला म्हणाले माझं काही काम नाही, ही माझी शेवटची निवडणूक. मी त्यांना विचारलं असं का म्हणता? तर म्हणाले समाज ज्या हातांमध्ये द्यायचा आहे ते हात तयार झाले. मी पुढची निवडणूक लढणार नाही असे गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, अशा आठवणी पंकजा मुंडे यांनी सांगितल्या आहेत.
पुढे पंकजा मुंडे यांनी राजकारणाबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील जोरदार चर्चा रंगली आहे. त्या म्हणाल्या की, राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे आहे. आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात. कशातही आपलं नाव ओढतात, असे म्हणत पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातील टीका-टिप्पणीवर खंत व्यक्त केली. जालना येथे शिवसेनेच्या वतीने पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. तुमच्या नजरेत मला गोपीनाथ मुंडे दिसतात, ती नजर खाली जाऊ नये म्हणून राजकारणात आले आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.